नागपूरच्या अशोक चौकात घराच्या बाल्कनीतून जाणारा उड्डाणपूल जात आहे. सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मध्यप्रदेशचा 90 अंशाचा पूल व्हायरल झाल्यानंतर आता नागपूरच्या या पुलाची चर्चा रंगली आहे.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या विकासकामांमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कमाल टॉकीज चौक ते दिघोरी चौक उड्डाणपूलाच्या बांधकामादरम्यान अशोक चौक येथील गोल राऊंड पुलाचा काही भाग थेट एका व्यक्तीच्या घराच्या बाल्कनीत शिरला आहे. त्यामुळे हा पूल सध्या चर्चेचा विषय आहे. घराच्या मालकाचे नाव प्रविण पत्रे असून त्यांच्या घराच्या बाल्कनीतून उड्डाणपुलाच्या रोटरीचा एक भाग जातो.
advertisement
घर पाडणार का?
या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नागपूर महापालिकेला पत्र पाठवत संबंधित घर हटवण्याची मागणी केली आहे. मात्र महानगरपालिकेने देखील हे घर अनाधिकृत असल्याचे सांगण्यात आले आहे . त्यामुळे आता हे घर पाडणार का याविषयी चर्चा सुरू आहे. याविषयी बोलताना घराचे मालक प्रविण पत्रे म्हणाले, घराच्या बाल्कनीतून उड्डाणपूल गेला त्याविषयी मला काही हरकत नाही.
पुलाची वेगळीच चर्चा
सोशल मीडियावर नागपूरच्या या पुलाची सध्या जोरदार चर्चा आहे. उड्डाणपुलाचे काम देखील जोरात सुरू आहे, शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे.मात्र घराच्या बाल्कनीतून गेल्याने या पुलाची वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे प्रशासन या परिस्थितीवर काय उपाययोजना करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.