नागपूरात पुरामुळे साधारण १५०० दुकानांमध्ये पाणी शिरल्याने कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने साधारण १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. झाशी राणी चौकात एकाच संकुलातील २०० दुकानांमध्ये पाणी शिरलं. या नुकसानीमुळे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सणासुदीच्या काळात अनेकांनी नवीन खरेदी करून आणलेले कपडे, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, पुस्तके, डिटर्जंट, धान्य, पुस्तकं, सोने-चांदीचे दुकानातील दागिन्यांसह माल पाण्यात बुडाला. आर्थिक मदतीसह पुढील तीन महिने मासिक शुल्कातही सूट देण्याची नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची मागणी आहे.
advertisement
गाड्यांचेही पुरात प्रचंड नुकसान झाले आहे. पाण्यात बुडाल्याने ५०० च्या वर कार तर 1000च्या वर बाईकचे नुकसान झालेय. आजपासून गाड्यांच्या विमा सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. शहरातील पुरात नुकसान झालेल्या कार दुरुस्तीसाठी दीड ते दोन महिने लागतील. अनेक वस्त्यांमध्ये पार्किंगमध्ये पाणी गेल्याने कारचं नुकसान झाले. पुरामुळे विविध भागातील कारचे १०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. विमा सर्वेक्षण झाल्यावर कारच्या दुरुस्तीचं काम सुरु होणार आहे. अंबाझरी, शंकरनगर, हजारीपहाड, बर्डी परिसरात कारचं सर्वाधिक नुकसान झालेय.
नागपूर शहरात नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात आली आहे. यामध्ये जिल्हा प्रशासन सोबत महानगरपालिका प्रशासनाची कर्मचारीही कार्यरत आहेत. नाग नदीच्या पुरामुळे शहरातील ज्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले त्या घरांचे पंचनामे करण्यात येतायत. महानगरपालिकेचे ६० कर संग्राहक , १५ महसूल निरीक्षक, १० सहाय्यक अधीक्षक यांच्यासोबत तहसील कार्यालयाकडे उपलब्ध असणाऱ्या १६ तलाठी अन् ग्रामीण भागातील आणखी २८ तलाठ्यांची मदत घेण्यात येणार आहे. हे सर्व पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून मदत दिली जाण्याची शक्यता आहे.
