बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. नांदेड वाघाळा महानगरपालिकेकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर महापालिका निवडणुकीत सत्तापालट होणार की काँग्रेस झुंज देऊन सत्ता काबीज करण्यात यशस्वी होईल, अशा चर्चा रंगत असतानाच मुख्य पदाधिकाऱ्यांनीच काँग्रेसचा हात सोडल्यानेच पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
काँग्रेसच्या माजी महापौर जयश्री पावडे आणि माजी उपमहापौर सतीश देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याचबरोबर मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. महानगरपालिकेच्या तोंडावर नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरू झाली आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा
बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून राबविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.
