नांदेड जिल्ह्यातील गोळेगाव तालुका उमरी इथं 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली होती. संजीवनी सुधाकर कमळे (वय १९ ) आणि लखन बालाजी भंडारे (वय १७ रा. बोरजूनी) असं मयत तरुण आणि तरुणीचे नाव आहे. संजीवनीचं गावातील दुसऱ्या ठिकाणी लग्न लावून देण्यात आलं होतं. पण लग्न झाल्यानंतरही संजीवनी आणि लखन भेटत होते. २५ ऑगस्टच्या दिवशी लखन हा संजीवनीला भेटायला गेला होता. त्यावेळी संजीवनीच्या सासरच्या लोकांनी दोघांना पकडलं. त्यानंतर संजीवनीच्या वडिलांना बोलावण्यात आलं होतं. या दोघांनाही बांधून बेदम मारहाण करण्यात आली होती.
advertisement
त्याच दिवशी या दोघांना एखाद्या गुराप्रमाणे दोरीने हाताला बांधला होतं. दोघांना दोरीने बांधून गावात धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, लखनचे हात एका दोरीने बांधले आहे. त्याला गावातून फिरवलं जात आहे. तर त्याच्यापाठोपाठ एक वृद्ध व्यक्तीने संजीवनीचे हात दोरीने बांधले होते, तिलाही गावातून फिरवलं जात होतं. त्यानंतर या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. संजीवनी हिचे वडील, काका आणि आजोबांनी विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराला बेदम मारहाण केली आणि विहिरीत फेकून दिलं.
काय आहे प्रकरण?
मयत संजीवनी सुधाकर कमळे आणि लखन बालाजी भंडारे हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. गेल्या वर्षी संजीवनी हीचा विवाह गोळेगाव येथील एका तरुणासोबत करून देण्यात आला होता. तरीही लपून-छपून या दोघांच्या गाठीभेटी चालूच होत्या. त्यांच्या प्रेमप्रकरणाला मुलीच्या आई वडिलांचा प्रखर विरोध होता. गेल्या वर्षभरापूर्वी मुलीचा विवाह झाला असल्याने काही महिन्यांपूर्वीच मुलाची समजूत काढून मुलीला भेटण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी दुपारी मुलीचे सासर असलेल्या गोळेगाव येथे दोघांना एकत्र पकडण्यात आलं. सासरच्यांनी मुलीच्या वडिलांनाही तिथं बोलावून घेतलं. यावेळी दोघांना बेदम मारहाण करून संपविलं. दोघांचेही मृतदेह जवळच असलेल्या बोरजुनी शिवारातील एका विहिरीत नेऊन टाकलं होतं.