ही घटना ताजी असताना आता नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याच्या राठोडवाडी इथं मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका विवाहितेला लग्नाच्या १२ दिवशी विष पाजून मारलं आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून नराधम आरोपी पीडितेचा हुंड्यासाठी छळ करत होते. पीडितेनं माहेरून १ लाख रुपये घेऊन यावेत, अशी मागणी सासरचे करत होते. पण ही मागणी पूर्ण न केल्याने आरोपींनी पीडितेला विष पाजून मारलं आहे.
advertisement
ताऊबाई सुधाकर राठोड असं मृत पावलेल्या १८ वर्षीय नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह सासरा, सासू व दिरावर गुन्हा दाखल झाला. पती सुधाकरला अटक केली आहे. वसूर तांडा येथील वामन चव्हाण यांची मुलगी ताऊबाई हिचे लग्न राठोडवाडी (अखरगा) येथील सुधाकर राठोडसोबत २ जुलैला झाले. लग्नात ६ लाख रुपये हुंडा व ३ तोळे सोने देण्याचे ठरले होते. मुलीचे वडील वामन चव्हाण यांनी लग्नावेळी ५ लाख रुपये हुंडा, एक तोळ्याची अंगठी आणि २ तोळ्यांचे लॉकेट दिले. लग्नानंतर मुलगी व जावयास परतणीसाठी बोलावले होते.
त्या वेळी सुधाकरने हुंड्याचे राहिलेले एक लाख रुपये घेऊन ये. मला दूध डेअरी टाकायची आहे, अशी धमकी ताऊबाईला दिली. पण ती एक लाख रुपये न घेता ९ जुलैला सासरी गेली. त्यानंतर १० जुलैला सकाळी ७ वाजता ताऊबाईला उलट्या होत आहेत, लवकर या, असा निरोप मुलीच्या वडिलांना दिला. त्याप्रमाणे वामन चव्हाण मुलीच्या सासरी गेले. त्यानंतर ताऊबाईला मुखेडमध्ये प्राथमिक उपचार करून नांदेडला आणि तेथून हैदराबादला हलवले. मात्र, उपचार सुरू असताना १३ रोजी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
पण मृत्यूपूर्वी ताऊबाईने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. एक लाख रुपये हुंडा घेऊन न आल्याच्या कारणातून पती, सासरा, सासू आणि दीर यांनी मला जबरदस्तीने विष पाजलं, असं तिने १२ जुलैला सांगितले होते. त्यानंतर १३ जुलैला सायंकाळी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीचे वडील वामन चव्हाण यांच्या तक्रारीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.