नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक शासकीय आणि खाजगी कार्यालयात तसेच सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. या पावसाच्या पाण्यातून कार्यालय गाठणे खूपच अवघड झाले आहे.तसेच पावसाचे पाणी इतके आहे की दुचाकी सारखी इतर वाहने देखील बंद पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे उगाच पावसाच्या पाण्यात अडकून बसण्यापेक्षा अर्धापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर डी सुरेकर या चक्क ट्रॅक्टरवरून बसून न्यायालयात पोहोचल्या होत्या. त्यांच्या पाठोपाठ वकिलांनी देखील जेसीबीचा जूगाड करत न्यायालय गाठलं होतं. या दोघांचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
अर्धापूर परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे.या पावसामुळे अर्धापुर न्यायालयाला चहुबाजुने पाण्याने वेढा घातला होता.त्यामुळे दुचाकी किंवा चारचाकी जाणे अशक्य होते.त्यामुळे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर डी सुरेकर या ट्रॅक्टरवरून कर्तव्य बजावण्यासाठी न्यायालयात पोहोचल्या होत्या. तर त्यांच्यापाठोपाठ एक वकील जेसीबी घेऊन कोर्टात पोहोचला होता. या दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले आहे. तसेच जेसीबीच्या मदतीने न्यायालयात पोहोचणाऱ्या वकिलाचेही कौतुक होत आहे. दरम्यान या व्हिडिओनंतर अनेकांचा सरकारी कामाबद्दल असलेली विचारसरणी बदलली आहे.कारण सरकारी काम अन् सहा महिने थांब आहे, असे नेहमीच बोलले जाते. पण न्यायाधीश आर डी सुरेकर यांनी त्यांच्या या कृतीतून कर्तव्यनिष्ठा दाखवून दिली आहे.त्यामुळे त्यांचे प्रचंड कौतुक केले आहे.