बावीस वर्षीय महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या. नातेवाईकांनी 108 वर फोन केला मात्र रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. नऊ महिन्याच्या गर्भवतीला घेऊन नातेवाईकांनी ऑटोतून प्रवास सुरू केला. प्रसुतीकळा वाढल्याने महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली. नांदेड जिल्ह्यात ही घटना घडली.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मेथी गावातील 22 वर्षीय अश्विनी नालापले या महिलेला सकाळी प्रसुती वेदना सुरू झाल्या. नातेवाईकांनी 108 क्रमांकवर फोन केला. पण रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. महिलेच्या वेदना वाढत असल्याने नातेवाईकांनी नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेला घेऊन ऑटोतून प्रवास सुरू केला. मात्र रस्त्यातच प्रसुती कळा वाढल्या.
advertisement
त्यामुळे नात्यातील महिलांनी होनवडज फाट्याजवळ ऑटो थांबवली. रस्त्यालगच्या शेतात साडीचा आडोसा देऊन गर्भवती महिलेची प्रसुती करण्यात आली. महिलेने मुलाला जन्म दिला. मात्र या ठिकाणी आई आणि बाळाची नाळ तोडण्याची व्यवस्था नव्हती. स्थानिकांनी रुग्णवाहिका मागवून तातडीने आई आणि बाळाला मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. दरम्यान या घटनेनंतर ग्रामीण भागातील आरोग्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. कारण मेथी या गावापासून येवती आणि होनवडज ही आरोग्य उपकेंद जवळ आहेत. मात्र या केंद्रात सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्य सेवेसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे.