नांदेड : बँकेतून परत येत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला बंदुकीच्या धाकावर लुटल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. नांदेड शहरातील अष्टविनायक नगर येथे एका ज्येष्ठ नागरिकावर गोळीबार करून लुटलं आहे. याच भागात राहणारे रवींद्र जोशी बँकेतून 40 हजार रुपये घेऊन घरी जात होते, त्याचवेळी गेट जवळ त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले.
बाईकवरून आलेल्या या दोघांनी रवींद्र जोशी यांच्याकडे असलेल्या पैशांची पिशवी खेचायला सुरूवात केली. पैसे लुटताना रवींद्र जोशींनी प्रतिकार केला, यावेळी त्यांच्यात आणि आरोपींमध्ये झटापट झाली. यात रवींद्र जोशी यांच्या हाताल एक आणि पायाला एक गोळी लागली.
advertisement
जोशींकडे असलेले 40 हजार रुपये घेऊन आरोपी दुचाकीवरून पसार झाले. हल्ल्यात जखमी झालेल्या रवींद्र जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना एका मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली. या घटनेनंतर पोलीस तिथे दाखल झाले आणि आरोपींचा शोध सुरू झाला आहे.