नांदेड जिल्हयातील बिलोली तालुक्यातील केरुर गावातील रामा आरोटे यांच्या घरी गेल्या 19 जुलैला चोरीची घटना घडली होती. या घटनेची तक्रार आरोटे यांनी पोलिस ठाण्यात देण्याऐवजी थेट मांत्रिकाला बोलावले होते. आरोटे यांनी 11 ऑगस्टला धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथिल गंगाराम कादरी या मांत्रिकाला गावात बोलावून घेतले होते. गावात आल्यानंतर ज्या व्यक्तींवर चोरीचा संशय होता. त्यातील परमेश्वर राठोडसह इतर 5 अशा एकूण 6 जणांना हनुमान मंदिरासमोर नेण्यात आले होते.
advertisement
संशयित आरोपी मंदिरासमोर आल्यानंतर मांत्रिकाने सर्व गावकऱ्यांसमोर अद्धश्रद्धेचा बाजार मांडला.गावातील हनुमान मंदिरासमोर लिंबू, मिरची, नारळ ठेवून भोंदू बाबा गंगाराम कादरी याने त्याचा खेळ सुरु केला. ज्यांच्यावर चोरीचा संशय होता अशा सहा जणांना पाण्याच्या हौदात बुडवण्यात आले. त्यानंतर त्यांना तांदूळ टाकून मंतरलेला पानाचा विडा खायला लावला.
दरम्यान ही घटना पोलीस पाटलाने पाहताच त्याला विरोध केला.तरीही प्रकार सुरु असल्याने पोलीस पाटील वानोळे यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ पोलिसांना देण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात जादूटोना कायद्यान्वये 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
खरं तर गावातील पोलीस पाटलाने आम्हाला या घटनेची माहिती दिली होती.त्यामुळे आम्ही त्याला व्हिडिओ शुटींग करण्यास सांगितले होते. त्यानंतर आम्ही पोहोचलो तेव्हा गावात जादूटोण्याचा प्रकार होऊन गेला होता.
या प्रकरणात एका इसमाच्या घरी चोरी झाली होती.पण त्याने पोलिसात तक्रार न देता थेट 10 ऑगस्टला एका मांत्रिकाला बोलावले होते.त्यानंतर त्याने गावातील पाच जणांवर संशय घेत त्यांच्यावर मात्रिकाद्वारे अघोरी कृत्य करण्यात आले. आरोपींना कपड्यासह थंड आणि गार पाण्याने अंघोळ घालून त्यांना तांदूळ टाकलेला पानाचा विडा त्यांना खाऊ घालण्यात आला. या प्रकारामुळे एका व्यक्तीला त्रास झाला होता. या प्रकरणी आपण चौघा जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तसेच या घटनेचा अधिक तपास सूरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.
या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी या प्रकरणात जादूटोना कायद्यान्वये 4 जणांवर गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास सूरू केला आहे.