राधिका दिलीप तारमेकवाड असं १७ वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. ती किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील रहिवासी होती. महालक्ष्मी सणासाठी ती आजोळी आली असता पाण्याच्या टाकीत पडून तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राधिका ही हडसणी येथील आजोळी विठ्ठल दुर्गेवाड यांच्या घरी आली होती. दुपारी १२ च्या सुमारास ती घराच्या दुसऱ्या मजल्यावरील छतावर गेली. ती छतावर एकटीच होती. ती पाण्याच्या टाकीजवळ बसली असता ती अचानक पाण्याच्या टाकीत पडली. यातच तिचा मृत्यू झाला. छतावर गेलेली राधिका बराच वेळ झाला तरी ती खाली न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेतला, पण तिचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर संशय आल्यानंतर जेव्हा पाण्याच्या टाकीत पाहिलं, तेव्हा ही घटना उघडकीस आली.
advertisement
घरातील सदस्यांनी तिला तत्काळ माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. महालक्ष्मी सणासाठी आजोळी आलेल्या मुलीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.