घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुदखेड तालुक्यातील वाई येथील सत्यभामा चंचूलवाड यांचे पती बालाजी चंचूलवाड यांना साप चावला होता. त्यांच्या उपचारासाठी सत्यभामा चंचूलवाड यांनी मुदखेड येथील अमोल चौदंते, भीमा चौंदते आणि राहुल चौंदते यांच्याकडून व्याजानं दोन लाख रुपये घेतले होते. मात्र अनेकवेळा पैसे परत करून देखील सावकाराकडून व्याजाच्या पैशांची मागणी सुरूच होती.
advertisement
व्याजाच्या पैशांसाठी सावकाराकडून या महिलेच्या कुटुंबाचा छळ सुरू होता. सावकारानं व्याजाच्या पैशांसाठी सत्यभामा चंचूलवाड यांच्या पतीला जबर मारहाण देखील केली. त्यावेळी सत्यभामा यांचा मुलगा सिद्धांत आणि मुलगी सृष्टी यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून तक्रार देखील दाखल केली होती. कारवाई करा किंवा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रात केली होती. मात्र या पत्राची दखल घेण्यात आली नाही.
अखेर सावकाराच्या त्रासाला कंटाळून चंचूलवाड कुटुंबानं घर सोडलं. हे कुटुंब मागील अडीच वर्षांपासून मुंबईत राहत होतं. दोन दिवसांपूर्वी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर किडनी विकणे आहे, अशी जाहिरात लागली होती. या प्रकरणी न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीने या कुटुंबाशी संपर्क साधला असता त्यांनी आपली अपबिती सांगितली. हे वृत्त सविस्तर प्रकाशीत होताच आता या प्रकरणाची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.