अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप
प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचं वेळेत सीझर न झाल्याने तिचा नवजात बालकासह मृत्यू झाला. ज्या दिवशी महिला प्रसूतीसाठी दाखल झाली, त्यावेळी सीझर सोडून सगळेजण एका डॉक्टरच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. आठ तास उशीरा सीझर झाल्याने महिला आणि बाळाचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. नांदेड शहराजवळच्या काकांडी गावातील विजयमाला कदम ह्या बाळंतीण महिलेला प्रसूतीसाठी सायंकाळी सात वाजता दाखल करण्यात आले. पण त्या दिवशी एका डॉक्टरचा वाढदिवस होता. सगळेजण त्या पार्टीला गेले होते. आठ तास उशीरा रात्री तीन वाजता विजयमाला कदम यांचे सीझर झाले. उपचाराला विलंब झाल्याने मायलेकाचा मृत्यू झाला असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
advertisement
त्या दिवशी कदम कुटुंबीयांना बाहेरून 70 हजाराच्या औषधी मागवण्यात आल्या, त्याच्या पावत्या आपल्याकडे असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला. त्या दिवशी कोणाचा वाढदिवस होता? कोण कोण पार्टीला गेले होते? याची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. आज नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी काकांडी येथे जाऊन मयत विजयमाला कदम यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आई-लेकाचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला. याबाबत रूग्णालय प्रशासनाकडून कुठलाही खुलासा अजुन करण्यात आला नाही.
वाचा - 'नांदेडच्या 41 रुग्णांची सरकारकडून हत्या..' विजय वडेट्टीवार यांचे गंभीर आरोप, म्हणाले..
नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव सुरुच
विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरूच आहे. मागील 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात 12 नवजात बालकांचा समावेश होता. या घटनेनंतर सोमवारी रात्री पुन्हा अत्यवस्थ असलेल्या चार नवजात बालकांसह सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 48 तासात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 31 पर्यंत गेली आहे. या घटनेनंतरही रुग्णालय प्रशासन गाफिल असल्याचे दिसून येत आहे.
मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नांदेडच्या या शासकीय रुग्णालयात 30 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 1 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या दीड ते तीन दिवसाच्या नवजात बालकांचा समावेश आहे. यासोबतच सर्प दंश, विष प्राशन आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकारानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.