नांदेड जिल्हयातील देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर हे आता भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचं दिसून येत आहे. भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या दोघांची भेट घेण्याअगोदर आमदार अंतापुरकर यांनी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती देखील खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण आणि अंतापूरकर यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
लोकसभा निवडणुकीत देखील अंतापूरकर यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही. शिवाय राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अंतापूरकर लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा नांदेड जिल्ह्यात सुरू झाली आहे. जर अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास हा काँग्रेससाठी अशोक चव्हाण यांच्यानंतर दुसरा मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.