भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. याआधीही अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभेचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र आता जिल्ह्यातील वातावरण पाहता अशोक चव्हाण आणि माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर लोकसभा लढण्यास इच्छुक नसल्याचे कळते आहे. याविषयीच न्यूज १८ लोकमतने अशोक चव्हाण यांना विचारले.
त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, नांदेड लोकसभेची पोटनिवडणुकीबद्दल माझ्या नावाची चर्चा असली तरी मी लोकसभा लढवणार नाही. त्या चर्चा कल्पोकल्पित असल्याचे स्पष्टीकरण राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी दिले. लोकसभा लढण्यासाठी मी इच्छुक नाही, मला लोकसभा लढायची आहे, अशी मागणी मी पक्षाकडे केलेली नाही किंबहुना पक्षानेही मला याबाबत काही सांगितले नाही. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्यामागे आम्ही राहू, असे अशोक चव्हाण म्हणाले.
advertisement
मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय महाराष्ट्र हिताचा असला पाहिजे अशी इच्छा
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र घडवण्यामध्ये आगामी काळ महत्त्वाचा आहे. म्हणून त्यांचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा असावा, अशी आमची इच्छा आणि अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
नाना पटोलेंबाबत संजय राऊत खरे बोलले
जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसचे राज्यातील नेतृत्व सक्षम नाही असे तिरकस विधान संजय राउत यांनी केले होते. नाना पटोले यांच्यावरील टीकेवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत बोलले ते खरे आहे. संजय राऊत यांना ही गोष्ट कळाली आनंदाची बाब आहे पण त्यांना उशिरा कळालं... देर आये दुरुस्त आए.. अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली.