राजेंद्र पैलवार असं आत्महत्या करणाऱ्या 43 वर्षीय शेतकरी बापाचं नाव आहे. तर ओमकार पैलवार असं गळफास घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे. 16 वर्षीय मुलगा ओमकार पैलवार हा उदगीर इथं शिकत होता. मकर संक्रांतीनिमित्त तो आपल्या गावी बिलोली तालुक्यातील मिनकी इथं आला होता. सणासाठी घरी आल्यानंतर त्याने आपल्या वडिलांकडे नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य आणि नवीन मोबाईलची मागणी केली.
advertisement
पण वडिलांकडे पैसे नव्हते. काही दिवस थांब तुला नवीन कपडे आणि मोबाईल घेऊन देतो, असं वडिलांनी सांगितलं. मात्र नाराज झालेल्या ओमकार याने टोकाचे पाऊल उचललं. त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा घरी न आल्याने वडिलानी शोधाशोध केली. तेव्हा शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन ओमकारने आत्महत्या केल्याचे त्यांना दिसलं.
पोटच्या लेकराने अशाप्रकारे आत्महत्या केल्याचं लक्षात येताच पाहताच हतबल पित्याने मुलाने गळफास घेतलेला दोरखंड सोडून घेतला आणि त्याच दोरखंडाने, त्याच झाडाला गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली. मृत राजेंद्र पैलवार हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या शेतीवर चार लाखाचे कर्ज होते. डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणि आणि सततची नापिकी यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं. अशात मुलाचा इच्छा पूर्ण न केल्याचं दु:ख मनाला लागल्याने त्यांनी स्वत:ही आपल्या आयुष्याचा शेवट केला.