वाडी पाटी येथे तब्बल 111 एकर जागेत मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी कामाला सुरुवात केली आहे. सभेच्या ठिकाणाचं भूमीपूजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी परिसरातील जवळपास 40 गावातून निधीचं संकलन केलं जाणार आहे. 33 जेसीबी आणि 16 ट्रॅक्टरद्वारे सभा स्थळाच्या सफाईचं काम सुरू आहे. या सभेसाठी जवळपास पाच लाख लोकांच्या नियोजनाची तयारी केली जात आहे.
advertisement
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी आपलं पहिलं उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांतही आरक्षण न मिळाल्यानं ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. जरांगे पाटील यांनी आता राज्य सरकारला आरक्षणासाठी 24 डिसेंबरची डेडलाइन दिली आहे. ते आता मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर दौरा करून मराठी बांधवांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या नांदेड जिल्ह्यात तीन सभा होणार आहेत.