नांदेडच्या शासकिय वैद्यकीय रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून मृत्यूतांडव सुरू आहे. या परिसरात रोज लोकांचे टाहो कानावर पडतात. मंत्री, नेत्यांपुढे मयतांचे नातलग हंबरडा फोडून रडत रडत आपल्या व्यथा सांगताना दिसतील. गेल्या पाच दिवसापासुन नांदेडमध्ये हीच परिस्तिथी आहे. शासनाने या घटनेची दखल घेतली. पण अजून काहीच सुधारणा झाली नाही. आज देखील 11 मृत्यू झाले. त्यात 3 नवजात अर्भक आणि एक लहान बाळाचा समावेश आहे.
advertisement
एकाच दिवसात 24 मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्य सरकारचे मंत्री धाऊन नांदेडला आले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री गिरीष महाजन यांनी रूग्णालयात जाऊन आढावा घेतला. या घटनेची नैतिक जबाबदारी हसन मुश्रीफ यांनी स्वीकारली. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील नांदेडचा दौरा केला. ह्या घटनांना राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. राज्य सरकारने ह्या हत्या, खून केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. नांदेडमध्ये मृत्यूचा तांडव सुरू आहे. पण राज्य सरकारने लावलेल्या चौकशी समितीने एक प्रकारे रुग्णालय प्रशासनाला क्लिन चीट दिली आहे. 24 मृत्यूप्रकरणी आरोग्य यंत्रणेचा दोष समितीला आढळला नाही.
नांदेडमधील ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य सरकारने तातडीने डॉक्टर, नर्स, अन्य आरोग्य कर्मचारी यांची तात्पुरती का होईना भरती करावी आणि औषध पुरवठा करावा अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. नांदेडमधील मृत्यू प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप आणि राजकरण सुरू आहे. पण याच नांदेडच्या घटनेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव उघड झालं. याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. आता सामान्य जनतेच्या आरोग्याशी सुरू असलेल्या या तडजोडीबाबत उच्च न्यायालय कडक भुमिका घेईल अशी आशा आहे.
2 ऑक्टोबर - 24 तासात 24 मृत्यू, त्यात 12 नवजात अर्भक
3 ऑक्टोबर - 24 तासात 7 मृत्यू, त्यात 4 अर्भक
4 ऑक्टोबर - 24 तासात 6 मृत्यू, त्यात 2 अर्भक
5 oct 24 तासात 14 मृत्यु त्यात 5 अर्भक
6 ऑक्टोबर - 24 तासात 11 मृत्यू, त्यात 4 अर्भक
गेल्या पाच दिवसात एकूण 62 मृत्यू, त्यात 27 अर्भक आणि लहान बालकांचा समावेश आहे.