मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका जोडप्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. शुक्रवारी हे जोडपं रात्री जेवण करून घरात झोपलं होतं. पण मध्यरात्री काळाने त्यांच्यावर झडप घातली. दुर्घटनेत झोपलेल्या ठिकाणीच दोघांचा मृत्यू झाला आहे. एकाच रात्री जोडप्याचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, कंधार तालुक्यातील कोटबाजार येथील शेख नासेर (वय अंदाजे ७० वर्षे) आणि त्यांची पत्नी शेख हसीना (वय अंदाजे ६५ वर्षे) हे दोघे त्यांच्या कच्च्या मातीच्या घरात रात्री झोपले होते. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सतत पाऊस कोसळत असल्यामुळे घराच्या मातीच्या भिंती कमकुवत झाल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री अचानक त्यांच्या खोलीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली.
भिंत कोसळल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जागे झाले आणि त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या या वृद्ध दाम्पत्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले, परंतु भिंतीचा ढिगारा मोठा असल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात अडचण येत होती. अखेर, स्थानिकांनी मोठ्या प्रयत्नांनी त्यांना बाहेर काढले, पण तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या दुर्दैवी घटनेने शेख कुटुंब आणि त्यांच्या गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.