ही घटना वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमेश कॉलनी परिसरात घडली. 'मुलं चोरणारी' असल्याच्या संशयावरून एका बुरखाधारी महिलेला जमावाने पोलिसांसमोरच मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमेश कॉलनी भागात एक बुरखा घातलेली महिला संशयास्पद रित्या फिरत होती. ती मुले चोरणारी असल्याच्या अफवेमुळे परिसरातील महिला आणि पुरुषांनी तिला घेरले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांच्या समोरच जमावाने त्या महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये मारहाण सुरू असताना पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही, त्यांनी जमावाला रोखण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत.
advertisement
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांसमोरच एका महिलेला मारहाण होऊनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही, यावरून सर्वत्र चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.