याबाबत मिळालेली माहिती अशी की, स्नेहा यांचे पती अरुण बेंद्रिकर हे विष्णुपुरी इथून घरी परत येत होते. त्यांच्या दुचाकीला कहाळा-गडगा इथं अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अरुण यांचा मृत्यू झाला. अरुण यांचे अपघातात जागीच निधन झाल्यानंतर त्यांच्या खिशात असणाऱ्या ओळखपत्राच्या आधारे माहिती घेऊन पत्नीला याबाबत सांगण्यात आले.
advertisement
पत्नी स्नेहा यांना पती अरुण यांच्या निधनाची माहिती मिळताच जबर धक्का बसला. यातूनच त्यांनी रात्री उशिरा घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. स्नेहा यांचे पती अरुण हे महावितरणमध्ये कर्मचारी होते. दोघांना अडीच वर्षांची मुलगीसुद्धा आहे. पतीचं अपघाती निधन आणि पत्नीच्या आत्महत्येमुळे अडीच वर्षांची चिमुकली पोरकी झाली. या घटनेमुळे नायगाव तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येतेय.
रात्री दीड वाजेदरम्यान घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली.अरुण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन विष्णुपुरी शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आलं. तर स्नेहा यांच्या मृतदेहावर नायगाव येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले. या दाम्पत्याच्या पार्थिव देहांवर बेंद्री येथे रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलीच्या हातातील दूध संपण्याआधीच जीवन संपविले
पतीच्या अपघाताची घटना समजतात कुटुंबीयांनी पत्नीसह नांदेड येथील शासकीय रुग्णालय गाठले. त्यावेळी डॉक्टरांनी अरुणचा मृत्यू झाल्याचे कळविले आणि सकाळी मृतदेह ताब्यात देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर अरुणच्या पत्नीला गावाकडे पाठवून दिले. रात्री दीडच्या सुमारास काही महिला तिच्यासोबत बसलेल्या होत्या. मात्र मुलीला पिण्यासाठी दूध देउन येते असे म्हणून ती एका खोलीमध्ये गेली. मुलीला पिण्यासाठी दूध दिले , मुलीचे दूध संपण्या अगोदरच तिने गळफास लावून आत्महत्या केली.