भररस्त्यात धमकी
समोर आलेल्या माहितीनुसार, समाधान आहेर हे आपल्या कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन प्रचार करत असताना ही घटना घडली. एका अज्ञात तरुणाने अचानक त्यांच्यासमोर येऊन पिस्तूल बाहेर काढले आणि "प्रचाराला फिरायचे नाही," असा दम भरला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते, मात्र नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत त्या तरुणाला जागीच पकडले आणि चोप दिला.
advertisement
'तो' प्रकाश लोंढेंचा माणूस? 'आप'चा गंभीर आरोप
या प्रकरणात आम आदमी पक्षाने अत्यंत गंभीर दावा केला आहे. बंदूक दाखवणारा तरुण हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे. विशेष म्हणजे, प्रकाश लोंढे हे सध्या जेलमध्ये असून तिथूनच निवडणूक लढवत आहेत. या आरोपामुळे नाशिकमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
व्हिडिओ व्हायरल, पोलिसांत धाव
या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सातपूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, यामागे कोणाचे षडयंत्र आहे का, याचा तपास सुरू केला आहे. भरनिवडणुकीत उमेदवारावर बंदूक ताणली गेल्याने नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
