नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला असे सांगून अनेक गुन्हेगारांनी समाज माध्यमांवर दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. पण नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे सांगून पोलिसांनी गुन्हेगारीला अटकाव घालण्याचा प्रयत्न केला. म्होरक्या प्रकाश लोंढे उर्फ बॉस याला बेड्या ठोकून त्याच्यावर मकोकाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाश लोंढे याची काकू मयत पावल्याने त्याला न्यायालयाच्या
परवानगीने अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले.
advertisement
काकूच्या अंत्यसंस्कारासाठी प्रकाश लोंढे बालेकिल्ल्यात
बुधवारी साडे नऊच्या सुमारास पोलिसांच्या बंदोबस्तात प्रकाश लोंढे याला सातपूर भागात अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आले. यावेळी त्याच्या समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. शांत राहा, संयम पाळा, आपल्याला खंबीर राहून लढायचे आहे, असे आवाहन त्याने आपल्या समर्थकांना केले. माझ्या कुटुंबालाही सांगतो आता रडायची वेळ नाही, आता हिमतीने लढूयात, असे म्हणत आगामी काळातील इरादे प्रकाश लोंढे यांने स्पष्ट केले.
प्रकाश लोंढे आणि सूनही निवडणुकीच्या रिंगणात
प्रकाश लोंढे हा आरपीआय आठवले गटाचा माजी नगरसेवक आहे. सातपूर भागात त्याचा मोठा दरारा आहे. त्याची परिसरात खूप दहशत आहे. तसेच त्याला मानणारा वर्गही मोठा आहे. जेलमध्ये असूनही त्याला आरपीआयने एबी फॉर्म दिला. न्यायालयाच्या परवानगीने तो निवडणुकीला सामोरे जातो आहे. त्याची सून दीक्षा लोंढे देखील आरपीआयच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात आहे.
सातपूरमध्ये लोंढे गँगची दहशत
सातपूर आणि अंबड या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना अडवून लुटमार केली जाते, कुणाला धमकावले जाते. दुकानदारांकडून हफ्ते मागितले जातात. नकार दिला तर त्यांना मारहाण केली जाते. एकंदरित या परिसरात लोंढे गँगची दहशत मोठी आहे. राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून आम्हाला कुणीच हात लावू शकत नाही, असे लोंढे गँगमधील सदस्य अप्रत्यक्षपणे वागण्यातून सांगत होते. पण पोलिसांनी त्यांचा चांगलाच माज मोडला आहे.
