यशराज गांगुर्डे असं हत्या झालेल्या १६ वर्षीय मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. खासगी शिकवणी वर्गात (ट्युशन) बेंचवर बसण्यावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस दोन्ही अल्पवयीन आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातपूर भागातील ज्ञानगंगा क्लासेसमध्ये यशराज गांगुर्डे हा दहावीचा विद्यार्थी शिकवणीसाठी जात होता. बुधवारी (१ ऑगस्ट) त्याचा त्याच्याच क्लासमधील दोन अल्पवयीन मित्रांसोबत बेंचवर बसण्यावरून वाद झाला. तेव्हापासून दोन्ही आरोपी यशराजला खुन्नस देत होते. पण शनिवारी पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला.
advertisement
क्लासच्या आवारातच या दोन मुलांनी यशराजला मारहाण करण्यास सुरुवात केली. हातच्या चापटी आणि लाथा-बुक्क्यांनी केलेल्या या मारहाणीत यशराज गंभीर जखमी झाला. हाणामारीच्या घटनेनंतर त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सातपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. खाजगी क्लाससारख्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.