नाशिक - कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसाय गेले. मात्र, तरीही जिद्द न हारता आपल्या मेहनतीने, प्रामाणिकपणे प्रयत्न करत एका व्यक्तीने पुन्हा आपला व्यवसाय उभा केला आहे. आज याच व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
अनिल मराठे असे या व्यक्तीचे नाव आहे. कोरोनापूर्वी त्यांनी कापडी पिशव्यांच्या व्यवसाय सुरू केला होता. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र, कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाले आणि इतर व्यापाऱ्यांप्रमाणे त्यांचाही व्यवसाय बंद पडला. त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले.
advertisement
त्यांनी घरातील सर्व पैसे खर्च करुन पिशव्यांच्या माल भरला होता. पण अनेक महिने दुकान बंद होते. त्यामुळे आर्थिक परिस्थितीही खालावली होती. दुकान भाडे तत्त्वावर होते. दर महिन्याला दुकानाचे भाडे द्यावे लागत होते. त्यामुळे त्यांना दुकानही बंद करण्याची वेळ आली. यानंतर शेवटी 5 ते 6 महिन्यांनी हळूहळू व्यवसाय सुरू झाला. दुकानातील उरलेला माल त्यांनी घरी आणून ठेवला होता. तो माल ते दुपारच्या वेळी इंदिरा नगर परिसरात एका झाडाखाली विकू लागले.
तिथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत गेला. तर दुसरीकडे हळूहळू लॉकडाऊनही कमी होत गेले. मात्र, नागरिक घराबाहेर येण्यासाठी घाबरतच होते. त्या करिता आपणच लोकांपर्यंत जाऊन आपली वस्तू विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीला ते गाडीवर पाईप बांधून नाशिकमध्ये कापडी पिशव्या विकायचे. तेव्हा देखील लोकांना ते घेण्यासाठी आवडत असे.
स्पेशल पुणेरी भेळ, 82 वर्षांची आहे परंपरा, पण नेमकी मिळते कुठे? VIDEO
नंतर प्रतिसाद चांगला मिळत गेल्याने काहीच महिन्यात त्यांनी ई रिक्षा घेऊन त्यावर आपली पुढची वाटचाल सुरू केली. ते आता नाशिकमध्ये आपल्या ई रिक्षावर फिरुन कापडी पिशव्यांची विक्री करत आहेत. नाशिक येथील अनेक भागात मोठ्या प्रमाणात माझी आणि माझा चालत्या फिरत्या दुकानाची ओळख निर्माण झाली आहे, असे त्यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले.
आज त्यांचे नाशिकमध्ये 3 असेच चालते फिरते कापडी पिशव्यांचे दुकान आहे. यामध्ये 20 रुपयांपासून ते 700 रुपयांपर्यंतच्या विविध कंपनीच्या कापडी पिशव्या ते विकतात. हा संपूर्ण माल पश्चिम बंगाल, गुजरात आणि नाशिक येथून खरेदी केला जातो. यातून सर्व खर्च काढून ते 40 ते 50 हजार रुपयांची कमाई करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.