कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे, खेरवाडी, ओढा आणि देवळाली या रेल्वे स्थानकांची पाहणी केली. रेल्वे विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने पाहणी करत पायाभूत सुविधांची स्थिती आणि प्रवासी हाताळणी क्षमतेचा आढावा सुद्धा या ठिकाणी घेण्यात आला. शिवाय, जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांच्या परिसरात स्वच्छता, साफसफाई, कचरा व्यवस्थापन, शौचालयाची देखभाल आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता यांसह अनेक गोष्टींवर भर दिला जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी स्टेशन परिसरात अतिरिक्त पाण्याची सुविधा उभारली जाणार आहे.
advertisement
कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तांसोबत देवळाली रेल्वे स्थानकाची पाहणी करताना कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळालीचे अध्यक्ष ब्रिगेडियर एन. आर. पांडे सुद्धा उपस्थित होते. यासह इतरत्र प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. "भाविकांचा लक्षणीय आकडा लक्षात घेता, पायाभूत सुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा, गर्दीचं व्यवस्थापन आणि सर्व यंत्रणांमधील समन्वय या गोष्टी आवश्यक आहे. आजच्या पाहणीमुळे स्थानिक पातळीवरील गरजा स्पष्ट झाल्या असून त्या वेळेत पूर्ण करून भाविकांना सुरक्षित आणि उत्कृष्ट प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तांनी केलेली आहे.
