गव्हापासून तयार होणारे सरगुंडे बनवण्यासाठी विशेष पद्धत वापरली जाते. त्यासाठी सर्वप्रथम सुमारे 2 किलो गहू 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजवून घेतले जातात. त्यानंतर हे गहू कापडात बांधून रात्रभर ठेवले जातात. पुढील दिवशी या गव्हाचे पीठ दळून घेतले जाते आणि बारीक चाळणीने चाळले जाते.
यानंतर या पिठात पाणी घालून ते व्यवस्थित भिजवले जाते. या भिजलेल्या पिठाची लाटी तयार करून घेतली जाते. लाटी तयार झाल्यानंतर सर म्हणजेच गव्हाचे धांडे वापरून त्यावर फिरवत सरगुंडे तयार केले जातात. या प्रक्रियेत गव्हाची गुणवत्ता चांगली असणे महत्त्वाचे ठरते, कारण त्यामुळे लाटी तुटत नाही आणि सरगुंडे नीट तयार होतात.
advertisement
तयार झालेले सरगुंडे प्रथम थोडा वेळ वाळवून घेतले जातात. साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर ते सरातून वेगळे करून पुन्हा एक दिवस उन्हात चांगले वाळवले जातात. पूर्णपणे वाळल्यानंतर हे सरगुंडे साठवून ठेवता येतात. खाण्याच्या वेळी सरगुंडे उकळून त्यांना आमरसासोबत खाल्ले जाते. तसेच तिखट मसाल्यातही ते चविष्ट लागतात. पारंपरिक पद्धतीने तयार होणारे हे सरगुंडे आजही विदर्भातील उन्हाळी संस्कृतीचा अविभाज्य भाग मानले जातात.





