पहाटे ३ वाजता पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेने खरातविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेने बुधवारी (१८ मार्च) पहाटे ३ वाजेच्या सुमारास सापळा रचून खरातला ताब्यात घेतले. केवळ अत्याचारच नव्हे, तर ज्योतिष व्यवसायाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक पेनड्राईव्ह जप्त केला असून, त्यात तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. हे व्हिडिओ नक्की कोणाचे आहेत आणि खरात त्यांचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करत होता का, याची सत्यता पोलीस आता पडताळत आहेत.
advertisement
कोण आहे हा 'कॅप्टन' अशोक खरात?
अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असून त्याने १५४ देशांचा दौरा केल्याचा दावा केला आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील 'श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट'चा तो अध्यक्ष आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या मंदिराला भेट दिली होती. तेव्हा खरात प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने एकनाथ शिंदेंचं भविष्य सांगितलं होतं.
तो स्वतःला मोठा अंकशास्त्रज्ञ (Numerologist) म्हणवून घ्यायचा. अनेक बडे नेते आणि उद्योजक आपल्या राजकीय भविष्यासाठी त्याच्याकडे सल्ला घ्यायला जात असत. खरातने मर्चंट नेव्हीतील आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि विविध देशांतील संस्कृतीच्या अभ्यासाचा वापर करून लोकांचा विश्वास संपादन केला होता. मात्र, अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली तो महिलांचं शोषण करत असल्याचं आता प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्याच्याकडे ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
