मुंबई : प्रत्येकालाच स्वतःचे घर असतेच असे नाही. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अनेकांना वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थलांतर करावे लागते. अशा वेळी भाड्याच्या घरात राहणे हा एकमेव पर्याय उरतो. मात्र भाड्याचे घर घेताना केवळ जागा आणि भाडे पाहून निर्णय घेणे पुरेसे ठरत नाही. भाडे करार (Rent Agreement) हा तुमच्या आर्थिक आणि कायदेशीर सुरक्षेचा महत्त्वाचा दस्तऐवज असल्याने तो करताना विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
advertisement
अनेक वेळा लोक घाईत किंवा विश्वासावर करारावर स्वाक्षरी करतात आणि अटी-शर्ती नीट वाचत नाहीत. पुढे घर रिकामे करताना किंवा भाडेवाढ, डिपॉझिट परतावा, दुरुस्ती खर्च यासारख्या मुद्द्यांवरून वाद निर्माण होतात. त्यामुळे भाड्याचे घर बदलत असाल किंवा नवीन घरात जात असाल, तर करारातील प्रत्येक मुद्दा समजून घेणे गरजेचे आहे.
सामान्यतः भाडे करार ११ महिन्यांसाठी केला जातो आणि त्यानंतर नूतनीकरण केले जाते. करारामध्ये भाडेवाढीबाबत स्पष्ट उल्लेख असावा. अनेक ठिकाणी वर्षाला ८ ते १० टक्के भाडेवाढ केली जाते, मात्र ही वाढ किती असेल, कधी लागू होईल आणि ती दोन्ही पक्षांच्या संमतीनेच होईल का, हे करारात स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे.
भाडे करारातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट. किती रक्कम जमा करायची, घर रिकामे करताना ती कधी आणि कशा पद्धतीने परत केली जाईल, तसेच कोणत्या कारणासाठी त्यातून कपात केली जाऊ शकते, याची स्पष्ट माहिती करारात असावी. अन्यथा, घर सोडताना डिपॉझिट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो.
घरात शिफ्ट होण्यापूर्वी घराची स्थिती नीट तपासणे तितकेच आवश्यक आहे. वायरिंग, नळ, बाथरूम, दरवाजे, खिडक्या, रंगकाम किंवा इतर कोणतीही तोडफोड असल्यास ती लगेच घरमालकाच्या निदर्शनास आणावी आणि शक्य असल्यास त्याची नोंद करारात करावी. अन्यथा, नंतर घर सोडताना त्या नुकसानीची जबाबदारी तुमच्यावर टाकली जाऊ शकते.
देखभाल आणि दुरुस्ती खर्च कोण करणार, हा मुद्दाही आधीच स्पष्ट केला पाहिजे. किरकोळ दुरुस्ती भाडेकरू करणार की मोठ्या दुरुस्त्यांची जबाबदारी घरमालकाची असेल, हे करारात नमूद असावे. यामुळे भविष्यात अनावश्यक वाद टाळता येतात.
भाडे भरण्याची तारीख, पद्धत आणि उशीर झाल्यास आकारले जाणारे दंड याबबतही स्पष्टता असणे गरजेचे आहे. दर महिन्याला भाडे कधी भरायचे, ऑनलाइन की रोख, याचा उल्लेख करारात असावा. वेळेत भाडे न भरल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाणार का, हेही आधीच समजून घ्या.
जर तुम्ही सोसायटीतील घर भाड्याने घेत असाल, तर पार्किंग, जिम, स्विमिंग पूल, क्लब हाऊस यांसारख्या सुविधांसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार का, याची माहिती घ्या आणि त्याचा उल्लेख करारात करा. कोणतीही अतिरिक्त किंवा वेगळी अट नंतर जोडली जाणार नाही, याची खात्री करून घ्या.
भाडे करार करण्यापूर्वी स्थानिक भाडे कायदे आणि नियम समजून घेणेही महत्त्वाचे आहे. गरज असल्यास स्थानिक वकील किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. करारात भाड्याची रक्कम, कालावधी, भाडेवाढ, डिपॉझिट, नोटीस कालावधी, अपरिहार्य परिस्थिती आणि इतर सर्व अटी स्पष्टपणे नमूद असाव्यात. काळजीपूर्वक वाचून, समजून आणि समाधान झाल्यानंतरच करारावर स्वाक्षरी केल्यास भविष्यातील अनेक अडचणी टाळता येतील.
