मंगळवारी अजित पवारांच्या पक्षाची मुंबईत बैठक झाली. खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ही बैठक घेण्यात आली होती, पण या बैठकीला आमदार नवाब मलिकांनी हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. खरं तर गेल्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यामुळे महायुतीत वादाला तोंड फुटलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता. पण फडणवीसांचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचं आता लपून राहिलं नाही.
advertisement
अजित पवारांना मलिकांची एवढी राजकीय गरज का भासलीय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. खरं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा जिंकता आली आहे. पक्ष महायुतीसोबत गेल्यामुळे मुस्लिम मतदार दूरावल्याचं पक्षातील नेत्यांची भावना आहे. अशातचं विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. अजित पवारांनी दोन उमेदवार या निवडणुकीत उभे केले आहे, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका एका आमदारांचं मत महत्वाचं आहे, त्यामुळेचं आता अजित पवारांना नवाब मलिकांची गरज भासली आहे.
नवाब मलिकांच्या बैठकीतील हजेरी विषयी विचारलं असता तुम्हाला काही त्रास आहे का? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी विचारला.
नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप 2021 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी केला होता, त्यानंतर मलिक केंद्रीय यंत्रणांच्या रडावर आले होते. पुढे मनी लॉन्ड्रींग प्रकरणी नवाब मलिकांना तुरुंगवारी करावी लागली. सध्या ते वैद्यकीय उपचारासाठी जामीनावर आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मलिका कोणत्या राष्ट्रवादीसोबत जाणार अशी चर्चा रंगली होती. दरम्यान हिवाळी अधिवेशनात आपण सत्ताधारी राष्ट्रवादीसोबत असल्याचं मलिकांनी दाखून दिलं होतं. आणि त्यावरून फडणवीस आणि अजित पवारांमध्ये पत्र प्रपंच रंगला होता. आता पुन्हा एकदा मलिकांवरून महायुतीत राजकारण रंगलंय.
आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे नवाब मलिकांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुकीत दूर गेलेल्या मुस्लिमांना पुन्हा आपल्याबाजूने वळवण्याचा प्रयत्न तर अजित पवारांकडून केला जात नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.