मुंबई, 26 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये 1 तास चर्चा झाली. नवाब मलिक यांच्यासोबत त्यांची कन्या सना मलिकही होत्या. मतदारसंघातील नागरिकांच्या प्रलंबित कामांबाबतची निवेदन दोघांनीही अजित पवारांना दिली, तसंच राष्ट्रवादी सत्तेत असूनही काम होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
advertisement
वैद्यकीय कारणांमुळे नवाब मलिक यांना कोर्टाने जामीन दिला, त्यानंतर मलिक नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहिले. अधिवेशनावेळी मलिक राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला, यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांना सोबत घ्यायला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. फडणवीस यांनी याबाबतचं पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं.
तटकरे काय म्हणाले?
नवाब मलिक यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक त्यांच्या मतदारसंघाच्या संदर्भात प्रश्न घेऊन आले होते. अजितदादा आणि नवाब मलिक यांच्यात चर्चा झाली, पण तेव्हा मी पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीला बसलो होतो, त्यामुळे त्या बैठकीत काय झालं, हे मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सुनिल तटकरे यांनी दिली.
लोकसभेसाठी राष्ट्रवादीला किती जागा?
'लोकसभा निवडणुकांसंबंधी अमित शाह यांच्याशी चर्चा होईल. राष्ट्रवादी पक्ष म्हणून काय वाटतं, ते नेत्यांसमोर मांडू. सम समान जागा असं काही नाही. आमचं उद्दिष्ट 45+ आहे,' असं सुनिल तटकरे म्हणाले.