मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा भाजपचा विरोध झुगारला आहे, त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाद होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक सुरू आहे. विधान परिषद आणि विधानसभेसंदर्भातली रणनीती निश्चित करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीला आमदार नवाब मलिकही उपस्थित आहेत.
advertisement
नवाब मलिक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. याआधीही भाजपने नवाब मलिकांबाबत आक्षेप घेतले होते. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले होते, यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता.
नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्यानंतर याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून नवाब मलिक यांना सत्ताधारी बाकावर बसवण्याला आमचा विरोध असल्याचं स्पष्ट केलं होतं. महाविकासआघाडी सरकार असताना भाजपने नवाब मलिक यांच्यावर देशद्रोह्यांशी संबंध असल्याचे आरोप केले होते, याप्रकरणी नवाब मलिक यांना अटकही झाली, पण प्रकृतीच्या कारणामुळे कोर्टाने नवाब मलिक यांना जामीन दिला.
राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक
काय म्हणाले होते फडणवीस?
'माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते, विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकारसुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, असं आमचं मत आहे.
सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारच आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही. असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कुणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे, परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटकपक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.
त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकासआघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही, आपण आमच्या भावनांशी नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.' असं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलं होतं.