शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसाच्या आधी दिल्लीत स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. या स्नेह भोजनास राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इतर पक्षांचे नेतेदेखील उपस्थित होते. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. ही भेट तशी औपचारिक वाटत असली, तरी ती शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रात्री झालेल्या भेटीनंतरच घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, पटेल आणि मोदी यांच्यात राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा मुद्दा या बैठकीत विशेषतः केंद्रस्थानी होता. महायुतीला या निवडणुकांत चांगले यश मिळेल, असा विश्वास पटेल यांनी पंतप्रधानांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा....
राज्यात राष्ट्रवादीचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिकेसह इतर महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार-अजित पवार यांची बैठक महत्त्वाची समजली जात आहे.
