धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद नाकारल्यानंतर आणि बीडचे पालकत्व अजित पवार यांनी स्वीकारल्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बीडमधली भीषण सामाजिक आणि राजकीय अवस्था विषद केली. धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने बीडचे पालकमंत्रिपद असल्याने जिल्ह्याची वाट लागली, असेही सोळंके म्हणाले.
तुमची बदनामी होतेय, सावध व्हा, सोळंके यांचा दादा-फडणवीसांना सल्ला
advertisement
धनंजय मुंडे सातत्याने माझा संबंध नसल्याचे सांगत राजीनामा देण्याचे कारण विचारीत आहेत. पण वाल्मिकला कुणी पोसले? तो कुणाचा माणूस आहे? धनंजय मुंडे यांच्यामुळेच तो मोठा झाला. आम्हाला हे सगळे दिसते पण आमच्या पक्षनेतृत्वाला हे दिसत नाही, अशी खंत व्यक्त करीत प्रकाश सोळंके यांनी अजितदादांनाही लक्ष्य केले. बीड प्रकरणामुळे सरकारची बदनामी होत आहे. अजितदादा आणि फडणवीसांची देखील बदनामी होत असल्याचे सर्वसामान्य लोकांच्या चर्चेमधून दिसून येते, त्यामुळे त्यांनीही यासंदर्भात विचार करणे गरजेचे असल्याचे मत सोळंके यांनी व्यक्त केले.
धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रिपद दिल्यानेच जिल्ह्याची अतिशय वाईट अवस्था
अवैध धंद्यांना चालना, खंडणीचे प्रकारस वाळू उपसा, राखेचा उपसा, अमाप संपत्ती, हे सगळे पाहून कुणाचेही डोळे फिरतील. धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपदाचे सर्वाधिकार दिल्यानेच हे सगळे प्रकार झाले. हीच बाब आम्ही अजितदादांना सांगत होतो. त्यामुळेच धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रिपद देऊ नका, अशी विनंती आम्ही अजितदादांना केली होती. सरशेशेवटी अजितदादांनी बीडची जबाबदारी स्वीकारली, याचा आनंद आहे. परंतु धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रिपद दिल्यानेच जिल्ह्याची अतिशय वाईट अवस्था झाली हे देखील तितकेच खरे आहे. आताही नैतिकतेच्या मु्द्द्यावरून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर करावे, असा आग्रह सोळंके यांनी धरला.
प्रकाश सोळंके यांचा अजित पवार यांच्यावरही निशाणा
धनंजय मुंडे पाच वर्षापैकी चार वर्ष बीडचे पालकमंत्री होते. आम्ही त्यांच्या कारभारावर प्रचंड नाराज होतो. खरे तर आताही त्यांच्या मंत्रिपदाविषयी श्रेष्ठींनी निर्णय घ्यायला हवा होता. निकटवर्तीयावर आरोप आहेत. त्याने अमाप संपत्ती निर्माण केली आहे. जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा हवा. वाल्मिक कराडचा सहभाग दिसला, पण मुंडे यांचा रोल काय असे विचारले जाते तेव्हा वाल्मिक कुणामुळे पुढे आला, हे पक्षश्रेष्ठींना दिसत नाही, असा निशाणा सोळंके यांनी अजित पवार यांच्यावर साधला.
