या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेतून अजित पवारांनी दोन्ही पक्षांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पिंपरी चिंचवड साठी आपलं प्लॅनिंग काय आहेत? हेही अजित पवारांनी सांगितलं. सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर अशाप्रकारे आल्याने विविध चर्चांना उधाण आलं.
advertisement
दरम्यान आता दादा आणि ताई एकत्र आल्यानंतर अजित पवारांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळेंच्या भावजय सुनेत्रा पवार यांची रिअॅक्शन समोर आली आहे. ताई आणि दादा एकत्र येण्याबद्दल विचारलं असता सुनेत्रा पवार यांनी थेट हातच जोडले. त्यांनी यावर थेटपणे प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. एकीकडे ताई - दादा एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असताना सुनेत्रा पवारांनी दिलेल्या रिअॅक्शनमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
खरं तर, बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद भावजय आमने सामने होत्या. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणूक लढवत होत्या. तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे मैदानात होत्या. नणंद भावजयच्या या निवडणुकीत नणंदेनं बाजी मारली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया काय असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अशात आता त्यांनी या युतीबाबत थेट हात जोडल्याने पवार कुटुंबात नक्की काय सुरू आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
