अटकपूर्व जामिनावर न्यायालयाचा दिलासा
डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ते काही काळापासून फरार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी घेत न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे.
न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश दिले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ तारखेला होणार आहे. त्यामुळे सध्या त्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
advertisement
नातेवाईकांनी केले गंभीर आरोप
डॉ. मनिषा जेजुरकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी डॉ. निलेश जेजुरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत मनिषा यांच्या आत्महत्येस तेच जबाबदार असल्याचा दावा केला आहे. या आरोपांमुळे प्रकरण अधिक चर्चेत आले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ
डॉ. निलेश जेजुरकर हे नाशिकमधील जिल्हा रुग्णालय येथे मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर सध्या त्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
६ मार्चला घडली होती घटना
नाशिकमधील गंगापुर रोड परिसरातील डी. के. नगर येथे राहणाऱ्या डॉ. मनिषा जेजुरकर (वय ४०) यांनी ६ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरात खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत दुपारी सुमारे २.४० वाजता नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्य अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
