भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नेवासा येथील व्यापाऱ्याची आर्थिक लूट केल्याप्रकरणी सरकार वाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत. रत्न बसवून देण्याचे सांगत व्यापाऱ्याकडील 20 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या गायब केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
रत्न बसवून देतो सांगून सोन्याच्या अंगठ्या गायब, भामट्या खरातचा नवा कांड
नेवासा येथील व्यापारी राजेंद्र भागवत यांची डिसेंबर २०२२ मध्ये नाशिकमधील ओकस प्रॉपर्टी डेव्हलपर्सच्या कार्यालयात अशोक खरात यांच्याशी भेट झाली होती. यावेळी खरात याने रत्न बसवून देण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याकडील सुमारे २० ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या घेतल्या. मात्र काही दिवसांनंतर त्या अंगठ्या परत केल्यानंतर संशय निर्माण झाला. खरात याच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांची माहिती समोर आल्यानंतर व्यापारी राजेंद्र भागवत यांनी आपल्या अंगठ्यांची आणि त्यातील रत्नांची तपासणी करून घेतली. तपासणीत धक्कादायक बाब समोर आली. अंगठ्यांमध्ये बसवलेले रत्न बनावट असल्याचे स्पष्ट झाले, तसेच सोन्याच्या अंगठ्यांमध्येही फेरफार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
advertisement
खरातने केली साडेपाच लाख रुपयांची फसवणूक
या प्रकारामुळे सुमारे साडेपाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत अशोक खरात याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार सरकार वाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या खरात याच्याविरोधात आता आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीही वाढत असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
आतापर्यंत सगळ्या तक्रारदारांची माहिती गुप्त, फिर्यादी पहिल्यांदाच कॅमेरासमोर
अशोक खरात याच्याविरोधात तक्रार देणाऱ्या पीडितांची संख्या ८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत सगळ्या तक्रारदारांची माहिती पोलिसांनी गुप्त ठेवली. नेवासा येथील व्यापारी राजेंद्र भागवत यांच्या रूपाने पहिल्यांदाच तक्रारदार कॅमेरासमोर आले.
अशोक खरात याच्या अटकेची स्टोरी नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी सांगितली
अशोख खरात या भोंदू बाबाविरोधात आम्हाला माहिती कळाली. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे ऑपरेशन खरातवर लक्ष ठेवून होते. अशोक खरात याच्या भक्तगणांची संख्या मोठी असल्याने आणि त्याचे राजकीय कनेक्शन पाहता कोणताही दबाव येऊ नये यासाठी कारवाईची माहिती कुणालाही कळता कामा नये, अशी रणनीती आम्ही आखली. त्यानुसार आरोपीच्या घराच्या आसपास चोरी झाल्याचे बनाव आम्ही रचला. चोरी झाली... चोरी झाली, असे आम्ही आजूबाजूच्या परिसरात भासवले. परंतु आम्हाला आरोपी खरात घरात आहे की नाही, याबद्दल साशंकता होती. तो घरात आहे, याची माहिती आम्हाला मिळत नव्हती. मग आम्ही खरातच्या घरात चोर लपले आहेत का? अशी शंका घेऊन झाडाझडती घ्यायला सुरुवात केली. १५ मिनिटांच्या या ऑपरेशमध्ये खरात एका खोलीमध्ये आम्हाला आढळून आला. त्याला आम्ही तिथेच ताब्यात घेतला. काही कळायच्या आत तिथून त्याला आम्ही तडक पोलीस स्टेशनला घेऊन आलो. बरोबर ११ वाजून ५९ मिनिटांनी नाशिक पोलिसांनी ऑपरेशन खरात फत्ते केले, असा थरारक घटनाक्रम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कथन केला.
