एक दिवस कधी चुकला नाही! गरिब रुग्णांसाठी 15 वर्षांपासून घाटी रुग्णालयात मोफत जेवण, जैन अलर्टचा उपक्रम
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
पंधरा वर्षांपासून जैन अलर्ट या ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवण वाटपाचा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील घाटी रुग्णालय परिसरात गेल्या पंधरा वर्षांपासून जैन अलर्ट या ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवण वाटपाचा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. सकल जैन समाजाच्या पुढाकारातून सुरू असलेला हा उपक्रम आजही नियमितपणे सुरू असून, अनेक गरजूंसाठी मोठा आधार ठरत आहे.
दररोज साधारणपणे दीडशेहून अधिक लोकांना या उपक्रमातून जेवण दिले जाते. शहरातील जैन मंदिरात जेवण तयार केले जाते आणि दुपारी सुमारे एक वाजता वाहनाद्वारे घाटी रुग्णालय परिसरात आणून वितरण केले जाते. विशेष म्हणजे, जेवण वाटप सुरू झाल्यानंतर अवघ्या एका तासात संपूर्ण जेवण संपून जाते, इतकी याला मागणी असते.
या जेवणामध्ये पोळी, भाजी, भात आणि शिरा यांचा समावेश असतो. स्वच्छ आणि साधे, पण पौष्टिक अन्न देण्यावर भर ठेवण्यात येतो. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना अनेकदा जेवणाची अडचण भासते. अशा वेळी हा उपक्रम त्यांच्यासाठी उपयोगी ठरत असल्याचे दिसून येते.
advertisement
या सेवेसाठी जैन समाजाकडून तसेच इतर समाजातील नागरिकांकडूनही देणगी दिली जाते. इच्छुकांकडून एका दिवसाच्या जेवणासाठी सुमारे 4100 रुपये इतकी देणगी घेतली जाते. या योगदानातूनच हा उपक्रम अखंड सुरू ठेवला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम आजही नियमितपणे सुरू असून, शहरातील सामाजिक उपक्रमांमध्ये त्याचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 7:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
एक दिवस कधी चुकला नाही! गरिब रुग्णांसाठी 15 वर्षांपासून घाटी रुग्णालयात मोफत जेवण, जैन अलर्टचा उपक्रम









