महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषेच्या वादावर एक पाऊल पुढे टाकत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना मराठी आणि महाराष्ट्राविरोधात गरळ ओकली आहे. दुबे यांनी म्हटले की, महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो. तिकडे टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं? असा प्रश्न केला.
advertisement
आमच्या पैशांवर जगताय...
महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता. तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी झारखड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत, असे तारे देखील दुबे यांनी तोडले आहेत. सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे? मग वरुन आमचं शोषण करुन दादागिरी करता, अशी गरळ दुबे यांनी ओकली आहे.
मनसैनिकांनाही आव्हान...
हिंदी भाषिकांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनाही उघड आव्हान दिले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले की, "मुंबईत हिंदी भाषिकांना मारहाण करणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रातील उर्दू भाषिकांना मारहाण करा. स्वतःच्या घरात कुत्राही सिंह असतो. कोण कुत्रा आहे आणि कोण सिंह आहे ते तुम्हीच ठरवा." भाजप खासदार एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी हे आव्हान मराठी भाषेतही पोस्ट केले.
याआधीही निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राच्या भाषिक राजकारणाचा संबंध काश्मिरी पंडितांशी जोडला होता.
"मुंबईतील शिवसेना ठाकरे गट, मनसे राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार आणि काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावणारा सलाउद्दीन, मौलाना मसूद अझहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्यात काय फरक आहे? एकाला हिंदू असल्याने छळले गेले आणि दुसरा हिंदीमुळे अत्याचार करत आहे?", असा सवाल केला होता.