मारहाण करून दोरीने आवळला गळा
शीतल भामरे असं मृत महिलेचं नाव असून, नितीन भामरे असे फरार झालेल्या संशयित आरोपी पतीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितीन भामरे याला शीतल यांच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून दोघांमध्ये नेहमी वाद आणि भांडणे होत असत.
गुरुवारी रात्री दोघांमध्ये याच कारणावरून पुन्हा जोरदार वाद झाला. या वादातून नितीनने शीतल यांना अमानुष मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून शीतल यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
नणंदेमुळे घटना उघडकीस
खून केल्यानंतर आरोपी नितीन भामरे याने घराला बाहेरून कडी लावली आणि तो तत्काळ फरार झाला. मात्र, शीतल यांच्या नणंदेला काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला. तिने रात्री उशिरा घराचा दरवाजा उघडून आतमध्ये पाहिले असता, ही भयानक घटना उघडकीस आली. रक्ताच्या थारोळ्यात शीतल यांचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पंचवटी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपी नितीन भामरे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
