कासा पोलीस ठाण्यामागेच घडला संतापजनक प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या एका तक्रारी अर्जाच्या चौकशी संदर्भात कासा पोलीस ठाण्यात आली होती. याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शरद भोगाडे नावाच्या पोलीस हवालदाराने चौकशीच्या बहाण्याने महिलेला पोलीस ठाण्यामागे असलेल्या पोलीस लाईनच्या खोलीत नेले. त्याच ठिकाणी त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या संतापजनक प्रकारानंतर पीडित महिलेने धाडस दाखवत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.
advertisement
हवालदार शरद भोगाडेवर गुन्हा दाखल
डहाणू पोलीस ठाण्यात संबंधित हवालदार शरद भोगाडे याच्यावर झिरो एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हवालदार भोगाडे याच्यावर महिला लैंगिक अत्याचारासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पण एका पोलीस हवालदाराने तक्रारीच्या चौकशीसाठी आलेल्या महिलेवर अशाप्रकारे अत्याचार केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारीची तातडीने जिल्हा मुख्यालयात बदली केली आहे. तसेच या प्रकरणी सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
