Pandharpur News : विरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर : पंढरपूरमधून एक हादरून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका 22 वर्षीय महिलेने एका बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर महिलेचा त्रास प्रचंड वाढला. त्यामुळे दरम्यानच्या काळात तिच्यावर रुग्णालयात उपचार सूरू होते.पण या उपचारा दरम्यान तीनच दिवसात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आरती सुरज चव्हाण असे या 22 वर्षीय मृत महिलेचे नाव होते. आरतीच्या या मृत्यूने आता एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी आता कुटुंबीय कायदेशीर कारवाई करणार आहेत.
advertisement
पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील आरती जाधव हिला काही दिवसांपूर्वी शहरातील एका खाजगी रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी रूग्णालयात तिची प्रसूती पार पडली होती. या प्रसूती दरम्यान तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी कुटुंबियांना तिच्या गटाचं रक्त गोळा करण्याची विनंती केली.
डॉक्टरांच्या या विनंतीनुसार कुटुंबियांनी एका ब्लड बॅकेतून ओ पॉझिटीव्ह रक्त आणलं होतं. परंतू डॉक्टरांनी महिलेला रक्त चढवताच तिला आणखी त्रास झाला. त्यामुळे डॉक्टरांनी आरतीला सोलापूर येथील खाजगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे आरतीच्या नातेवाईकांनी सोलापूर येथील खाजगी रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान तिथे देखील तिला रक्त चढवण्यात आलं होतं. परंतू तीन दिवसानंतर महिलेचा त्रास कमी होत नव्हता.
शेवटी डॉक्टरांच्या लक्षात आले की, ब्लड बँकेने चुकीच्या रक्तगटाची पिशवी दिली. तिचा चुकीच रक्त चढवल्यामुळे तिला त्रास वाढला होता.त्यानंतर गुरूवारी दुपारी सोलापूर येथील खाजगी दवाखान्यामध्ये आरती जाधवचा मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता. तसेच आरतीच्या जाण्याने तिच्या नवजात बाळाच्या डोक्यावरच छत्र हरपलं आहे. दरम्यान आरतीचे नातेवाईक आता संबंधित रक्तपेढी विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
