ज्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत परवानगीशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळेल त्या क्षेत्रातील पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषद सभागृहात हॉटेलमधील अवैध व्यवसायाबाबत चर्चा केली गेली.
हॉटेल मालक, पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना सज्जड इशारा
हॉटेलमधील अवैध व्यवसायाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी हॉटेल मालक, पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिला. या प्रश्नाच्या चर्चेत आमदार शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेतला.
advertisement
गैरप्रकार आढळला नाही पण पुन्हा एकदा चौकशी करू
गृह राज्यमंत्री भोयर म्हणाले, आर्वी तालुक्यातील हॉटेलमधील अवैध व्यवसाय तक्रारींच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात आली असून कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तरीही लोकप्रतिनिधींच्या सूचनांची पुन्हा दखल घेत या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येईल. ही चौकशी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत केली जाईल. या चौकशीत कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी दिली.
