परभणी जिल्हा परिषद निवडणुकीतही घराणेशाहीचा अजब प्रकार समोर आला आहे. भाजप नेत्याच्या घरातील ५ जण जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे काही जण भाजपकडून तर काहीजण हे ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील चक्क पाच सदस्य यंदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. विशेष म्हणजे, हे पाचही सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने परभणीत या 'कौटुंबिक महासंग्रामा'ची जोरदार चर्चा सुरू आहे.
advertisement
एकाच घरात भाजप, काँग्रेस आणि 'मशाल'!
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातच आता राजकीय वैविध्य पाहायला मिळत आहे. कुटुंबातील काही सदस्य भाजपच्या विचारधारेसोबत आहेत, तर काही सदस्यांनी थेट विरोधकांशी हातमिळवणी केली आहे.
कुटुंबातील कोण, कुठून लढणार?
भाजप नेते सुरेश वरपुडकर यांचा मुलगा समशेर वरपुडकर हा भाजपच्या तिकिटावर सिंगणापूर गटातून रिंगणात आहे. तर, सून प्रेरणा वरपुडकर या भाजपच्या तिकिटावर पोखर्णी गटातून नशीब आजमावत आहेत.
या निवडणुकीतील सर्वात मोठा 'ट्विस्ट' म्हणजे वरपुडकरांच्या कन्या सोनल यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला असून त्या झरी गटातून 'मशाल' हाती घेऊन लढत आहेत.
लोहगाव गटात 'पुतण्या' विरुद्ध 'पुतण्या'
या निवडणुकीतील सर्वात हाय-व्होल्टेज लढत लोहगाव गटात पाहायला मिळणार आहे. येथे सुरेश वरपुडकर यांचे दोन पुतणे एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. बोनी वरपुडकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार असून अजित वरपुडकर हे काँग्रेसच्या तिकिटावर आपल्याच चुलत भावाविरोधात (बोनी) निवडणूक लढवत आहेत.
घराणेशाही की राजकीय रणनीती?
एकाच कुटुंबातील पाच सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवारी घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात दोन प्रकारचे सूर उमटत आहेत. विरोधकांनी याला घराणेशाहीचा कळस म्हटले आहे, तर काहींच्या मते ही कोणत्याही परिस्थितीत सत्ता घरातच ठेवण्याची एक मोठी राजकीय खेळी असू शकते. परभणीचे मतदार आता या 'वरपुडकर विरुद्ध वरपुडकर' लढतीत कोणाला कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
