नेमकं काय घडलं?
बाळाणी येथील गोविंदराव जिजाराव जाधव यांची मुलगी शारदा हिचा विवाह जांभोरा येथील भारत देशमुख यांच्यासोबत चार वर्षांपूर्वी झाला होता. शारदा देशमुख (२७) आणि तिचा मुलगा आदर्श (३) हे रक्षाबंधनासाठी पती भारत देशमुख यांच्यासोबत बामणीला येत होते. रविवार, १० ऑगस्ट रोजी हे तिघेजण माणकेश्वर येथे बस बदलण्यासाठी उतरले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, तिथे बसची वाट पाहत असताना त्यांनी माणकेश्वर येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा विचार केला असावा. यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच १३ ऑगस्ट रोजी अशोक काकडे यांच्या शेतातील विहिरीत मायलेकांचे मृतदेह आढळले. बामणी गावाजवळ ही घटना घडल्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
मृतदेहांची ओळख पटली
ग्रामस्थांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढले असता ते शारदा देशमुख आणि तिचा मुलगा आदर्श यांचे असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती बामणी येथील दीपक देशमुख यांनी जिंतूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहांचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले आहे.
याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, मात्र अंत्यसंस्कारानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी सांगितले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जांभोरा आणि बामणी या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. पती बेपत्ता असल्याने या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.