परभणी तालुक्यातील तट्टूजवळा येथे रामायण कथेचा लक्ष्मण शक्ती कार्यक्रम सुरू होता. कथा सूचक ह.भ.प. अभिमन्यू अंबाजी मुंडे यांनी 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम'चा जयघोष करत अखेरचा श्वास घेतला. शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पांडुरंगाच्या वारकऱ्याला विठू नामाचा गजर करतानाच मृत्यू आल्याची पंचक्रोशीत चर्चा आहे.
advertisement
अभिमन्यू मुंडे यांनी परभणी पोलिस दलात 35 वर्षे सेवा बजावली. त्यानंतर सन 2011 साली ते सेवानिवृत्त झाले. गेल्या काही वर्षांत ते जिल्ह्यातील विविध ठिकाणी कथा सूचक म्हणून सेवा देत होते. तट्टूजवळा येथे रामायण कथेचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी देखील अभिमन्यू मुंडे हे कथा सूचक म्हणून हजर होते.
लक्ष्मण शक्तीच्या कथेचे सूचन करत असताना अभिमन्यू हे 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम'चा जयघोष करून बाजूला सरकले आणि त्याच ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने परभणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
शेवटची इच्छा पूर्ण
दरम्यान, अभिमन्यू यांची शेवटची इच्छा ही कथा सांगतानाच मृत्यू यावा अशी होती. मरण आलं तर पांडुरंगाचं नामस्मरण करताना यावं असं ते म्हणायचे, असं कुटुंबीयांनी सांगितले. आता त्यांची ही इच्छा पूर्ण झाल्याची पंचक्रोशीत चर्चा आहे.
