'खाकी'चं स्वप्न मैदानावरच तुटलं! 1400 मीटर धावला, फक्त 200 मीटरवर होतं ध्येय, पण पुण्याच्या मैदानातच तरुणाचे ठोके थांबले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शनिवारी सकाळी ९ वाजून २४ मिनिटांनी पुरुषोत्तम १६०० मीटर धावण्याच्या शारीरिक चाचणीसाठी मैदानात उतरला होता. त्याने अत्यंत वेगाने दोन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या.
पुणे : अंगावर खाकी वर्दी चढवून आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने मैदानात उतरलेल्या एका तरुणासोबत धक्कादायक घडलं. २३ वर्षीय तरुणाचा धावताना मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या कारागृह शिपाई भरती प्रक्रियेत पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (वय २३, रा. चिंचोली, जि. बुलढाणा) या तरुणाने अखेरचा श्वास घेतला. धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी अवघे 200 मीटर अंतर बाकी असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला.
शनिवारी सकाळी ९ वाजून २४ मिनिटांनी पुरुषोत्तम १६०० मीटर धावण्याच्या शारीरिक चाचणीसाठी मैदानात उतरला होता. त्याने अत्यंत वेगाने दोन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. मात्र, तिसऱ्या फेरीपर्यंत सुमारे १४०० मीटर अंतर पार केल्यानंतर अचानक त्याला अपस्माराचा (फिट) झटका आला आणि तो धावतानाच जमिनीवर कोसळला. मैदानावरील वैद्यकीय पथकाने तातडीने धाव घेत प्राथमिक तपासणी केली असता, त्याच्या हृदयाचे ठोके अत्यंत मंद झाले होते. त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
advertisement
भरती प्रक्रियेतील वाढत्या मृत्यूंमुळे चिंता
चालू वर्षातील पोलीस भरतीदरम्यान झालेला हा तिसरा मृत्यू आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये संग्राम शिंदे आणि बीडमध्ये दीपक वाव्हळ या तरुणांचाही असाच दुर्दैवी मृत्यू झाला होता. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाने ५ किमीची अट कमी करून १६०० मीटर केली असून मैदानावर रुग्णवाहिका अनिवार्य केली आहे. मात्र, तरीही अशा घटना थांबत नसल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
advertisement
पुरुषोत्तमच्या मृत्यूची बातमी बुलढाण्यातील त्याच्या घरी कळवल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एका कष्टकरी तरुणाचे 'खाकी'चे स्वप्न मैदानावरच अधुरे राहिले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 9:27 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'खाकी'चं स्वप्न मैदानावरच तुटलं! 1400 मीटर धावला, फक्त 200 मीटरवर होतं ध्येय, पण पुण्याच्या मैदानातच तरुणाचे ठोके थांबले







