वेगळे राहून फायदा नाही, संघर्षात नेते कार्यकर्ते भरडले जातात, त्यापेक्षा एकत्र येऊन एकी-विकासाचे राजकारण करू, अशी अच्छा अजित पवार यांनी त्यांच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. त्यासंदर्भाने त्यांनी शरद पवार, जयंत पाटील, शशिकांत शिदे यांच्याशी मागील काही महिन्यांत अनेकदा चर्चाही केली होती, असे सांगितले जाते. एकत्रिकरणाचा पहिला टप्पा म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढले. परंतु अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या भूमिकेमुळे एकत्रिकरणाला खीळ बसल्याची चर्चा आहे. मात्र एकत्रिकरण होऊ नये अशीच इच्छा पार्थ पवार यांचीही असल्याचे कळते.
advertisement
पार्थ पवार यांच्या मनात काय?
अजित पवार यांनी शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील लोकांशी जुळवून घेऊन पुढे जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र दादांचे हे पाऊल पार्थ पवार यांना रुचत नव्हते. त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाशी जुळवून घेऊ नये, असे पार्थ पवार यांना मनोमन वाटत होते. किंबहुना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आलेल्या देखील पार्थ पवार यांना आवडले नव्हते. त्यांनी खासगीत बोलताना याविषयी नाराजी व्यक्त केली होती, असे सांगितले जाते.
सुनेत्रा पवार यांना शपथविधीसाठी तयार करण्यात पार्थ पवार यांचाही महत्त्वाचा सहभाग
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी अत्यंत घाईघाईत उरकण्यात आला, खरंच याची गरज होती का? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून याचा दोष अजितदादांच्या पक्षातील 'ज्येष्ठ त्रिमुर्तींना' देण्यात येतोय. परंतु जर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करायला आणि शपथविधीला विलंब केला तर ज्येष्ठ नेते शरद पवार हे आपले राजकीय कौशल्य पणाला लावून एकत्रिकरणाची समीकरणे जुळवून आणू शकतात, अशी भीती दादा गटातील नेत्यांना होती, असे राजकीय जाणकार सांगतात. याच शक्यतेवर बारामतीमधील एका नामांकित हॉटेलमधल्या बैठकीत चर्चा झाली. चर्चेअंती सुनेत्रा पवार दोन दिवसांत शपथ घेतील, असे एकमत झाले. यासंदर्भाने सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्याशी ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पोहोचविण्यासाठी 'संबंधित पुढाऱ्यांनी' त्यांची भेट घेतली. म्हणजेच सुनेत्रा पवार या शपथविधीसाठी तयार होण्यात किंवा त्यांना तयार करण्यात पार्थ पवार यांचाही महत्त्वाचा सहभाग होता, असे सांगितले जाते.
