वन विभागाने एक फोटो जारी केला आहे, या फोटोमध्येच सगळं गुपीत दडलं आहे. या फोटोवरुन ठार केलेला बिबट्याच नरभक्ष्यक होते ते समोर आलं आहे. रोहन बोंबे यांच्यावर हल्ला झालेल्या ठिकाणचे आणि ठार केलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे जुळल्याने हाच तो नरभक्षक बिबट्या असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

advertisement

२० दिवसांत तिघांचा बळी, नागरिकांमध्ये प्रचंड संताप

पिंपरखेड आणि परिसरात या नरभक्षक बिबट्याने गेल्या २० दिवसांत तीन जणांचा जीव घेतला होता. १२ ऑक्टोबर रोजी शिवन्या बोंबे (वय ५ वर्षे ६ महिने), २२ ऑक्टोबर रोजी भागुबाई जाधव (वय ८२ वर्षे) आणि २ नोव्हेंबर रोजी रोहन विलास बोंबे (वय १३ वर्षे) यांचा या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

advertisement

२ नोव्हेंबर रोजी रोहन बोंबे या १३ वर्षीय मुलाचा जीव गेल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला. संतप्त नागरिकांनी थेट वन विभागाची गाडी व स्थानिक बेस कॅम्पचे कार्यालय पेटवून दिले. याशिवाय, संतप्त जमावाने आपल्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करत बेल्हा-जेजुरी महामार्ग तसेच दुसऱ्या दिवशी मंचर येथे पुणे-नाशिक महामार्ग तब्बल १८ ते २० तास रोखून धरला होता, ज्यामुळे प्रशासनावर प्रचंड दबाव आला.

advertisement

लोकांच्या संतापानंतर कारवाईचे आदेश

जनप्रक्षोभ आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले. पुणे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांच्याकडून विशेष परवानगी मिळवून ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेत रेस्क्यू संस्था पुणे येथील डॉ. सात्विक पाठक, तसेच दोन शार्प शूटर - डॉ. प्रसाद दाभोळकर आणि जुबिन पोस्टवाला यांना पाचारण करण्यात आले. बिबट्याचा शोध घेण्यासाठी दिवसभर कॅमेरा ट्रॅप, पायांच्या ठशांचे निरीक्षण सुरू होते.

advertisement

ड्रोन, डार्ट आणि गोळीबाराचा थरार

रात्री उशिरा, पथकाला थर्मल ड्रोनच्या मदतीने पिंपरखेड गावाजवळ बिबट्या दिसला. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी पथकाने डार्ट (डार्ट गनने बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन) मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. डार्ट चुकल्यामुळे बिबट्या अधिक चवताळला आणि त्याने थेट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, कोणताही धोका न पत्करता, शार्प शूटरने तात्काळ कारवाई करत बिबट्यावर तीन राउंड गोळीबार केला. या गोळीबारात हा नरभक्षक बिबट्या जागीच ठार झाला.

6 वर्षांचा होता ठार झालेला बिबट्या वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ठार केलेला बिबट्या सहा वर्षांचा नर जातीचा होता. तसेच, ठार केलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे आणि रोहन बोंबे यांच्यावरील हल्ला झालेल्या ठिकाणचे पायांचे ठसे एकमेकांशी जुळल्याने, हाच बिबट्या तीन नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत होता, हे स्पष्ट झाले आहे. या यशस्वी कारवाईमुळे परिसरात वाढलेली दहशत काही प्रमाणात कमी झाली असून, स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या पथकाचे आभार मानले.