देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महेश लांडगे यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली होती. "तुम्ही कार्यक्रम करणार असाल तर आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत. आम्ही जन्मत:च लंगोट घालणारे आहोत" असं म्हणत लांडगेंनी अजित पवारांना थेट आव्हान दिलं होते. या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, "निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो. आमचे महेश लांडगे सध्या थोडे वैतागले आहेत, कारण समोरून होणाऱ्या आरोपांना उत्तर द्यावं लागत आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की..."
advertisement
''परिंदे को मिलेगी मंजिल एकदिन, ये उनके फैले हुये पंख बोलते है! और वही लोग जो खामोश रहते है, अक्सर जमाने मे जिनके हुनर बोलते है" या शायरीचा आधार घेत फडणवीस म्हणाले की, ज्यांच्याकडे कर्तृत्व असतं, त्यांचं कामच बोलतं. विरोधकांकडे सांगण्यासारखे काम नसल्यामुळे ते केवळ आरोप-प्रत्यारोपात निवडणूक गुंतवून ठेवू पाहत आहेत. "जरा समजून घ्या दादा, ते रागावले म्हणून तुम्ही रागावू नका," असा सल्ला त्यांनी लांडगेंना दिला.
एसआरए (SRA) वादावर थेट भाष्य
पिंपरी-चिंचवडमधील एसआरएच्या प्रकल्पावरूनही अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात वाद रंगला होता. यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, "कुणीतरी एसआरएसाठी धमकी देतंय असं महेश लांडगे म्हणाले. पण लक्षात ठेवा, येथे कायद्याचं राज्य चालेल, धमकीचं नाही. मुळात एसआरएचा अध्यक्ष मी स्वतः आहे. त्यामुळे जनतेच्या हितासाठी जी काही कारवाई करायची आहे, ती आम्ही १६ जानेवारीनंतर करू."
विकासाच्या मुद्द्यावर भर देण्याचे आवाहन
देवेंद्र फडणवीस यांनी महेश लांडगे यांना असा सल्ला दिला की, त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नये. "महेश दादा, तुम्ही टीका करू नका, फक्त आपण केलेल्या विकासकामांची जनतेला आठवण करून द्या. जेव्हा आपलं काम बोलतं, तेव्हा टीका करण्याची गरज उरत नाही," असे सांगत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केवळ विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवण्याचे आवाहन केले.
