नेमकं प्रकरण काय आहे?
काही दिवसांपूर्वी 'न्यूज 18 लोकमत'ने एक बातमी दिली होती. ज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मविआ सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा कट शिजत होता. दोघांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र सुरू होतं. न्यूज 18 लोकमतने या प्रकरणाची पाळं मुळं खणली होती. आता या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
advertisement
महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालकांनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना खोट्या ULC घोटाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता, असा दावा गृहमंत्रालयाकडे सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या निवृत्त डीजीपी रश्मी शुक्ला यांनी राज्य गृह विभागाला सादर केलेल्या विशेष चौकशी अहवालात ही बाब उघड झाली आहे. मुंबईचे माजी डीजीपी संजय पांडे यांनी 2016 च्या ULC घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा कट रचला होता. गेल्या हिवाळी अधिवेशनात न्यूज 18 लोकमतने याबाबतची बातमी दिली होती. यावरून भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी हल्लाबोल केला होता.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली "विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं होतं. आता या समितीच्या अहवालात षडयंत्र उघड झालं आहे. तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक राजीव जैन, पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे, सहायक पोलीस आयुक्त जादिकराव पोळ यांचा या समितीत समावेश होता.
या समितीने मुंबई उच्च न्यायालयात एक पेन ड्राईव्ह दिलं आहे. ज्यात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी फडणवीस आणि शिंदे यांना अडकवण्यासाठी षडयंत्र रचल्याबाबत एका स्टिंग ऑपरेशनचा तपशील देण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.
